( ठाणे )
राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पोलीस तपासाला मोठे धक्कादायक धागेदोरे सापडले आहेत. बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, वांगणी, अंबरनाथ आणि नाशिक येथे एकाचवेळी छापेमारी करत पोलिसांनी १५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त केला असून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नाशिकमधील ‘मालती IVF सेंटर’चे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
IVF सेंटरचा गैरवापर; डॉ. अमोल पाटीलवर सरोगेट एजंटचा आरोप
नाशिक महानगरपालिकेच्या मुंबई नाका परिसरातील मालती IVF सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तपासणी करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. बदलापूरमध्ये सापडलेल्या कागदपत्रांबाबत खुलासा करण्यासाठी सेंटरला नोटीसही बजावण्यात आली होती. यानंतर बदलापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा डॉ. अमोल पाटील यांना अटक केली. सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पीआय राजेश गज्जर यांनी दिली.
डॉ. पाटील हे दंतवैद्य; IVF परवाना पत्नीच्या नावे
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. अमोल पाटील हे मूळचे दंतवैद्य (डेंटिस्ट) आहेत. नाशिकमध्ये परवानगी असलेले IVF सेंटर त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. मात्र याच सेंटरच्या माध्यमातून स्त्रीबीज तस्करीचं बेकायदेशीर रॅकेट चालवलं जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे बदलापूर प्रकरणात नाशिकमधील कायदेशीर IVF सेंटरसोबतच ठाणे जिल्ह्यातील काही बेकायदेशीर IVF आणि सोनोग्राफी केंद्रांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
महिला आयोगाचा मोठा खुलासा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच बदलापूर दौऱ्यात माध्यमांशी बोलताना या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी आरोग्य क्षेत्राशी संबंधित नसताना स्त्रीबीज रोपण प्रक्रियेत वैद्यकीय काम करत होत्या.
बनावट आधार, एकाच महिलेला अनेकदा डोनर
तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी महिलांचे बनावट आधार कार्ड आणि सत्यप्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेला वेगवेगळ्या नावाने अनेकदा डोनर म्हणून वापरत होते. आतापर्यंत ५०० हून अधिक महिलांचा वापर झाल्याचा संशय असून, डोनर महिलांना २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते. आरोपींच्या मोबाईलमध्ये महिलांचे फोटो, इंजेक्शन, सोनोग्राफी, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले आहेत. या प्रकरणाचे राज्याबाहेरील कनेक्शन असल्याचीही माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
मास्टरमाइंड अजून फरार; पोलिसांचा मोठा इशारा
या प्रकरणात ठाणे जिल्ह्यासह राज्यातील काही डॉक्टर, हॉस्पिटल आणि IVF सेंटर यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बदलापूर आणि परिसरातील बेकायदेशीर IVF व सोनोग्राफी केंद्रांवर धाडसत्र सुरू असून, आणखी मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

