( नाशिक )
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथील समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहात अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता पाचवी ते सातवीतील आठ अल्पवयीन मुलांना गुंगीच्या गोळ्या देत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप दहावीतील सात विधीसंघर्षग्रस्त मुलांवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती असूनही वेळेत पोलिसांना न कळवल्याने वस्तीगृह अधीक्षक दूधसागरे यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्जन ठिकाणी नेऊन गुंगीच्या गोळ्या; भीतीमुळे मुलं गप्प
प्राथमिक माहितीनुसार, वस्तीगृहातील लहान विद्यार्थ्यांना परिसरातून निर्जन ठिकाणी नेण्यात येत होते. त्यांना गुंगीच्या आणि भांगेच्या गोळ्या देऊन अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. गुंगीचे औषध, मद्य पाजून अत्याचार केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांसह पालकांचा आरोप आहे. मारहाण आणि धमक्यांमुळे पीडित विद्यार्थी दीर्घकाळ भीतीपोटी शांत राहिले. अखेर काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. संतप्त पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.
गुंगीच्या गोळ्या कुठून? टपरी चालकाची चौकशी
या गुंगीच्या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या गेल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घोटी आणि इगतपुरी शहरातील काही टपऱ्यांमधून या गोळ्या खरेदी केल्या असाव्यात. या संदर्भात जुना मुंबई–आग्रा महामार्गावरील एका टपरी चालकाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी 3 मार्च रोजी गुन्हा दाखल करत तपास वेगात घेतला आहे.
वस्तीगृह बंद करून विद्यार्थ्यांचे स्थलांतर करणार
समाजकल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले की, “मी स्वतः वस्तीगृहाला भेट दिली आहे. प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचं दिसत आहे. सखोल तपास पोलीस करतील. हे वस्तीगृह लवकरच बंद करून विद्यार्थ्यांना अन्य सुरक्षित वस्तीगृहात हलवण्यात येईल.” या वस्तीगृहात एकूण 35 विद्यार्थी राहत होते. मात्र 26 फेब्रुवारीपासून सर्व विद्यार्थी होळीनिमित्त घरी गेले होते.
राज्यभर तपासणी मोहीम
या घटनेनंतर समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वस्तीगृहांची तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, सीसीटीव्ही कार्यरत आहेत का, तपासणी नियमित होते का, याची पडताळणी केली जाणार आहे.
एका पीडित विद्यार्थ्याने सांगितले, “दिवाळीपासून आमच्यावर अत्याचार सुरू होते. काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. शेवटी हिंमत करून पालकांना सगळं सांगितलं.” पीडितांच्या पालकांनीही दोषींवर कठोर कारवाई आणि मुलांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

