( मुंबई / वृत्तसंस्था )
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (Special Intensive Revision – SIR) मोहिमेला वेग आला असून, राज्यभरात माहिती संकलन आणि डिजिटायझेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार सकाळपर्यंत मतदारांशी संबंधित माहिती संकलनाचे 81.54 टक्के अर्ज वितरित करण्यात आले असून, 45.05 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिली.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 30 जून 2026 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदारांपैकी आतापर्यंत 7 कोटी 97 लाख 92 हजार 629 माहिती संकलन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच 4 कोटी 40 लाख 86 हजार 328 अर्जांची डिजिटल नोंदणी (डिजिटायझेशन) पूर्ण करण्यात आली आहे.
राज्यातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत ही विशेष सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ही प्रक्रिया 29 जुलैपर्यंत पूर्ण होणार होती. मात्र, मतदारांना आवश्यक माहिती सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने 10 दिवसांची मुदतवाढ दिली असून आता ही मोहीम 8 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या 1 लाख 253 बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. हे अधिकारी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळत असून, माहिती संकलन अर्जांचे वितरण आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम करत आहेत.
अर्ज वितरणात अनेक जिल्ह्यांची उल्लेखनीय कामगिरी दिसून आली आहे. हिंगोली जिल्हा 99.95 टक्क्यांसह राज्यात अव्वल असून, त्यापाठोपाठ जळगाव (99.70%), बुलढाणा (99.43%), धुळे (98.79%), अहमदनगर (98.25%), परभणी (97.85%) आणि गोंदिया (97.70%) या जिल्ह्यांनी 95 टक्क्यांहून अधिक अर्जांचे वितरण पूर्ण केले आहे.
डिजिटायझेशनच्या कामात यवतमाळ जिल्हा 76.89 टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर रत्नागिरीने 76.40 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण करून राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. याशिवाय चंद्रपूर (72.15%), परभणी (68.68%) आणि बुलढाणा (66.85%) या जिल्ह्यांनीही उल्लेखनीय प्रगती केली आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, जिल्हानिहाय अर्ज वितरण आणि डिजिटायझेशनची आकडेवारी ही विशेष सखोल पडताळणी मोहिमेतील प्रगती दर्शवते. आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची अचूक नोंद सुनिश्चित करणे आणि मतदार यादी अद्ययावत ठेवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरी भेट देत असल्यास आवश्यक माहिती आणि कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत. तसेच माहिती संकलन अर्ज अचूक भरून लवकरात लवकर जमा करावेत, जेणेकरून मतदार यादी अद्ययावत राहील आणि मतदानाचा अधिकार बजावताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

