(नाशिक)
संतांनी स्वतःसाठी काहीही न करता समाजासाठी कार्य केले. तीच परंपरा जोपासत सेवेकर्यांनी संतांप्रमाणे निष्काम कर्मयोग्याची भूमिका घेऊन समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करावे असा संदेश सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी दिला, तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी हात उंचावून गुरुमाऊलींना अभिवादन केले आणि जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये आज (शनिवार, २४ मे) मासिक महासत्संग अपूर्व उत्साहात साजरा झाला. देश-विदेशातून आलेल्या हजारो सेवेकऱ्यांची मासिक महासत्संगाला उपस्थिती लाभली. यावेळी गुरुमाऊलींचे अमृततुल्य प्रासादिक हितगुज झाले. सेवेकऱ्यांना संबोधित करताना गुरुमाऊली म्हणाले की, संत मंडळींनी समाजासाठी देह झिजवला. लोकांचे कल्याण केले. समाजाला, जनतेला योग्य दिशा दाखविली. अंधश्रद्धा दूर करून राष्ट्राभिमान जागवला. हे कार्य करताना लोभ, मोह, मान अपमान, मोठेपणा यापासून संत मंडळी चार हात लांब राहिली. हाच आदर्श जोपासत सेवेकर्यांनी सेवाकार्य करावे असा त्यांनी पुनरुच्चार केला.
सेवामार्गाचे आगामी उपक्रम…
देशात सर्वत्र सुवृष्टी होण्यासाठी सेवामार्गातर्फे नाशिकच्या रामकुंडावर दि. ३१ मे २०२५ रोजी गंगापूजनाचा सोहळा, देशाच्या संरक्षणासाठी ७ जून २०२५ रोजी त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरु मोरेदादा हॉस्पिटलच्या जागेवर भैरवचंडी पाठ वाचन, रविवार दि.८ जून रोजी गुरुपीठामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे सामुदायिक पारायण, विश्वशांती हेतू २७ जून ते ४ जुलै या काळात मथुरेत श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह असे बहुविध उपक्रम आगामी काळात आयोजित करण्यात आले आहेत,अशी माहिती मासिक सत्संगात देण्यात आली.
गुरुपुत्र – गुरुप्रणालीचे मार्गदर्शन..
मासिक महासत्संगात मार्गदर्शन करताना गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे यांनी सेवाकेंद्रांमध्ये जास्तीत जास्त सामुदायिक सेवा घेण्यात याव्यात असे सूचित केले तर श्री. नितीनभाऊ मोरे यांनी प्रत्येक सेवाकेंद्रात बालसंस्कार वर्ग सुरू होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. श्री. आबासाहेब मोरे म्हणाले की, सेवेकर्यांनी स्वतःला झोकून देऊन सेवाकार्य करावे, कारण ही भारतमातेची सेवा आहे.