( मुंबई )
85 वर्षांचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे संसदीय राजकारणातून निवृत्त होणार की सक्रिय राहणार, याबाबतची उत्सुकता अखेर संपली आहे. 1960 साली महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आजपर्यंत सलग लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या शरद पवार यांना महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार म्हणून अधिकृतपणे पुढे करण्यात आलं आहे. यामुळे पुढील सहा वर्षे ते राज्यसभेत कार्यरत राहणार आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठे संकेत मिळाले असून, महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकूण 7 जागा आहेत. त्यापैकी 6 जागा महायुतीला आणि 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी अखेर शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्यथा भाजपकडून आठवा उमेदवार उतरवण्याची तयारी होती.
काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांची मनधरणी
सुरुवातीला काँग्रेसकडून शरद पवारांच्या उमेदवारीवर आक्षेप होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती.
विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली
राज्यसभेच्या नावघोषणेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
“अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे. आता पुढे कोणतीही चर्चा सुरू नाही. सध्या दोन्ही बाजूंच्या भावना समजून घेणारे नेतृत्व नाही, त्यामुळे हा विषय पूर्णतः बाजूला पडला आहे.”
उद्धव ठाकरेंची भेट, पेच सुटला
राज्यसभेची जागा शिवसेनेची असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं, तर शरद पवार इच्छुक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पेच सोडवला. अखेर शरद पवार यांना आघाडीचा संयुक्त उमेदवार करण्यावर सहमती झाली.
महायुतीकडून आठवले, तावडे, इवनाते, वडकुते मैदानात
महायुतीकडून राज्यसभेसाठी पुढील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत:
- रामदास आठवले
- विनोद तावडे
- माया चिंतामण इवनाते
- रामराव वडकुते
तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
शरद पवार यांची उमेदवारी केवळ राज्यसभा निवडणुकीपुरती मर्यादित नसून, महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय आणि एकजूट कायम राहणार याचा तो स्पष्ट संकेत मानला जात आहे. अनुभवी नेतृत्व, संसदीय अनुभव आणि राजकीय तोल सांभाळण्याची क्षमता यामुळे पवार हेच आघाडीचं प्रमुख आधारस्तंभ ठरत असल्याचं चित्र आहे.

