(मुंबई)
मुंबई ते विजयदुर्ग सुरू करण्यात आलेल्या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई–विजयदुर्ग ही सागरी रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई–कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा एक प्रभावी पर्याय उपलब्ध झाला असून प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.
राज्यमंत्री कदम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबई व इतर भागात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा दिल्यास दापोली तालुक्यासह आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होईल. यामुळे कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी प्रवास अधिक सोयीस्कर ठरेल, तसेच स्थानिक पातळीवर सागरी वाहतुकीला चालना मिळून पर्यटन आणि आर्थिक घडामोडींनाही बळ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्या अनुषंगाने मुंबई–विजयदुर्ग सागरी रो-रो सेवेला हर्णे बंदर, ता. दापोली येथे थांबा देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

