(ठाणे)
ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी सायंकाळी १० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. योगायोग असा की, ठाणे महापालिकेच्या ४३व्या वर्धापन दिनाच्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घंटाळी परिसरातील अभिराज कन्स्ट्रक्शनच्या एका प्रकल्पावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी तब्बल २५ लाखांची मागणी केली होती. यातील १५ लाख रुपये रोख स्वरूपात आणि १० लाख रुपये ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यातून घेतल्याचे समोर आले आहे. तरीदेखील पाटोळे यांनी अतिक्रमण हटवले नाही, त्यामुळे संतप्त होऊन कंपनीचे अभिजीत कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली.
एसीबीने सापळा रचून ठाणे महापालिका मुख्यालयातील कर विभागाच्या कार्यालयातच पाटोळे यांना अभिजीत कदम यांच्याकडून आणखी १० लाख रुपये स्वीकारताना पकडले. घटनेनंतर त्यांच्या पालिकेतील कार्यालयातही तपासणी करण्यात आली असून पाटोळे यांची चौकशी सुरू आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या अंतर्गत बदल्यांमध्ये पाटोळे यांच्याकडे अतिक्रमण आणि निष्कासन उपायुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला होता. अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, फक्त दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना “कामात कोणतीही हलगर्जी नको” अशी कडक सूचना दिली होती. आणि त्यानंतरच हा घोटाळा उघडकीस आल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

