( परभणी )
परभणी जिल्ह्यातील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे या प्रकरणाला महत्त्वाची कलाटणी मिळाली असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला होता. या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद खंडपीठात थेट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत संबंधित पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले.
प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात या प्रकरणात बाजू मांडत मृत्यूच्या पार्श्वभूमीतील अनेक तथ्ये समोर ठेवली. न्यायालयाने तीव्र शब्दांत प्रशासनाच्या ढिसाळ तपासणीकडे लक्ष वेधत पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निकालामुळे मृत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याची आशा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तसेच, पोलिस यंत्रणेतील जबाबदारीचे भान पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे.