(रत्नागिरी)
लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी सन्मानाने वागून त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मागील लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याबाबत संबंधित विभागांनी लेखी अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कार्यालयीन कामकाजात नागरिकांना त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. अशा प्रकारे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिला.
आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नगर परिषद, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन कार्यालयाशी संबंधित एकूण सहा अर्ज दाखल झाले. या सर्व अर्जांवर वेळेत आणि योग्य निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

