(चिपळूण/ प्रतिनिधी)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षणातील उत्तरदायित्व आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ चिपळूणमध्ये एका शिक्षकाने भर पावसात एकट्याने उभे राहून अनोखे आंदोलन केले. या शांततापूर्ण निदर्शनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
चिपळूण येथील शिक्षक परवेज पिरजादे यांनी मुसळधार पावसाची पर्वा न करता हातात फलक घेऊन डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले. फलकावर “मी सोनम वांगचुक… उघडा डोळे, जागे व्हा… आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी!” असा संदेश लिहिण्यात आला होता. शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि परीक्षाप्रणालीतील विश्वासार्हता या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सलग उपोषण सुरू केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
याच घटनांच्या निषेधार्थ आणि वांगचुक यांच्या भूमिकेला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी परवेज पिरजादे यांनी चिपळूणमध्ये एकाकी निदर्शनाचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला ते एकटेच आंदोलन करत असताना तेथून जाणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका जाणून घेत त्यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दर्शविला. कोणत्याही संघटनेचा गाजावाजा किंवा मोठी गर्दी न करता, केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न समाजापुढे मांडण्यासाठी केलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा रंगली.

