(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय वाढली असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिलच्या मध्यातच जाणवणाऱ्या या उष्णतेचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे.
कडक उन्हामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. वाढते सिमेंटीकरण आणि सिमेंटच्या घरांची संख्या यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून रात्रीही उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसत आहेत. गॉगल, स्कार्फ, टोपी, छत्री आणि सुती रुमालांचा वापर वाढला आहे. दुचाकीस्वारही पूर्ण अंग झाकूनच प्रवास करत आहेत.
या उष्णतेचा बाजारपेठेवरही परिणाम जाणवत असून दुपारच्या वेळेत ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे लिंबू सरबत, उसाचा रस, ताक आणि शीतपेय विक्रेत्यांकडे मोठी गर्दी दिसत आहे. शेतकरी व कष्टकरी वर्गाला कामाच्या वेळा बदलाव्या लागत आहेत.
Heat Wave: काय करावे?
• पुरेसे पाणी प्या. तहान नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी घेणे आवश्यक.
• उन्हात काम करताना डोके, मान आणि चेहरा ओल्या कपड्याने झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाश टाळा.
• टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे व भाज्या आहारात घ्या.
• घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना पडदे लावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवा आणि पंखे किंवा ओल्या कपड्यांचा वापर करा.
• हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करा.
• बाहेर जाताना छत्री, टोपी आणि गॉगलचा वापर करा.
• ORS, लस्सी, ताक, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा नियमित समावेश करा.
Heat Wave: काय करू नये?
• दारू, चहा, कॉफी, कार्बोनेटेड थंड पेये किंवा जास्त साखर असलेली पेये टाळा; यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
• कडक उन्हात जास्त शारीरिक श्रम करणे टाळा.
• जड, प्रथिनयुक्त किंवा शिळे अन्न खाणे टाळा.
• दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका. छतावर जाणे किंवा वरच्या मजल्यावर थांबणे टाळा.
• गडद रंगाचे, घट्ट किंवा जाड कपडे घालू नका.
• बाहेर जाताना अनवाणी जाऊ नका; नेहमी चप्पल किंवा शूज वापरा.
• उष्णतेच्या काळात बंद, हवेशीर नसलेल्या जागेत स्वयंपाक करणे टाळा.

