( मुंबई )
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने समाजहितासाठी सातत्याने योगदान देणारे संगमेश्वर येथील पत्रकार व ‘रेल्वे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या समाजाभिमुख आणि निस्वार्थ कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील आझाद मैदानाजवळील मराठी पत्रकार भवन येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री. सचिन कळझुनकर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
पत्रकारिता आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांत संदेश जिमन यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि जनहिताच्या विषयांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत देण्यात आलेला “कोकण रत्न” पुरस्कार हा त्यांच्या निस्वार्थ सेवेचीच पावती मानली जात आहे.
चाकोरीबद्ध आयुष्याला छेद देत समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींमध्ये संदेश जिमन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असून, त्यांचा हा सन्मान संगमेश्वर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

