(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सावर्डे येथील श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ हे भविष्यात देशातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच उच्चस्तरीय संशोधनाचा पाया घातला जाणे ही ग्रामीण भागाच्या दृष्टीने विशेष आणि अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉ. काकोडकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. काकोडकर म्हणाले की, विद्यापीठ हे समाजाचे प्रतिबिंब असले पाहिजे. नव्याने सुरू झालेल्या या विद्यापीठामध्ये उच्चस्तरीय संशोधनाचा पाया सुरुवातीपासूनच घालण्यात आला आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची संशोधनकेंद्रित शैक्षणिक संस्था उभी राहणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.
डेरवण-सावर्डे परिसराचा उल्लेख करताना ते म्हणाले की, श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टच्या गेल्या अनेक वर्षांतील उत्तम कार्यामुळे हा परिसर एका ‘सिलेज’मध्ये (समग्र विकसित परिसर) रूपांतरित झाला आहे. रुग्णालय सेवा, शिक्षण आणि विविध क्रीडा उपक्रमांनंतर आता विद्यापीठाच्या माध्यमातून या परिसराच्या विकासाला आणखी मोठी दिशा मिळत आहे. भविष्यात देशाच्या विकासात या विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण व्हावी
गेल्या पाच दशकांपासून या परिसरात विविध क्षेत्रांत कार्य सुरू आहे. आरोग्यसेवेनंतर शिक्षण, क्रीडा आणि आता विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात संस्थेने पुढचे पाऊल टाकले आहे.
“विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता कोणत्याही आव्हानावर मात करून समस्या सोडविण्याची धमक असलेला असावा. अशा पद्धतीचे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल, याची मला खात्री आहे,” असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
विद्यापीठांनी संशोधनावर अधिक भर द्यावा
शिक्षण क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी विविध समित्यांवर काम करताना शिक्षण क्षेत्र जवळून पाहिले असल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. सध्या परीक्षांच्या आयोजनाबाबत निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा उल्लेख करताना त्यांनी विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली.
“विद्यापीठांनी आपली बहुतांश ऊर्जा शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनासाठी खर्च करावी. परीक्षा प्रक्रियेचे काम ठरावीक निकषांनुसार सक्षम संस्थांकडे सोपविण्याचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठांना संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी अधिक वेळ देता येईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठातील संशोधन प्रयोगशाळेचे कौतुक करताना ही प्रयोगशाळा अत्यंत दर्जेदार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला डेक्कन महाविद्यालयाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलपती पी. डी. पाटील, माजी मंत्री शशिकांत सुतार, श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणावली, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (NCRA-TIFR), पुणेचे डॉ. यशवंत गुप्ता, डॉ. अरविंद नातू, कुलपती विकास वालावलकर, संस्थेचे प्रमुख विश्वस्त अशोक जोशी, रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त व विद्यापीठाचे कुलपती विकास वालावलकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
फोटो : श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करताना प्रमुख विश्वस्त व विद्यापीठाचे कुलपती विकास वालावलकर. सोबत व्यासपीठावरील मान्यवर.

