(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आज (मंगळवारी) सकाळी लांजा तहसीलदार कार्यालयाला अचानक भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आमदारांच्या अचानक पाहणीमुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी त्यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूल प्रकरणांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना ती तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महसूल विभागातील विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याबद्दल आमदार सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला विनाकारण हेलपाटे मारायला लावू नका, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
“माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला छोट्या-मोठ्या कामांसाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावू नका. नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करा. कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा आमदार सामंत यांनी यावेळी दिला.
महिन्यांपासून रखडलेल्या प्रकरणांचा घेतला आढावा
भेटीदरम्यान महसूल विभागातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा आमदार सामंत यांनी सविस्तर आढावा घेतला. जमीनविषयक प्रकरणे, फेरफार नोंदी, नामांतरण, विविध दाखले तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि इतर महसूल विषयक अर्जांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
काही प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही तातडीने करून ती मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या काही प्रकरणांना भेटीदरम्यानच गती मिळाली.
नागरिकांशी थेट संवाद
तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांशीही आमदार सामंत यांनी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी आणि प्रलंबित कामांची माहिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामांसाठी वारंवार कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये, तसेच महसूल विभागातील कामकाजात अनावश्यक विलंब होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदारांच्या अचानक भेटीमुळे महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची काही काळ धावपळ उडाली. मात्र, या पाहणीमुळे प्रलंबित प्रकरणांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून नागरिकांची रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

