(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि ढिसाळ कारभारामुळे येथील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. कित्येक वर्ष या कारभारात सुधारणा होत नसल्याने याचा नाहक फटका रुग्ण जनतेला बसत आहे. वरिष्ठ विभागाचे वचक नसल्याने कामकाजात कामचुकार केला जात आहे. याची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी घेऊन डिंगणी उपसरपंच येथील आरोग्य केंद्र आवारात उपोषणास बसले आहेत. यावर सकारात्मक कारवाईचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची ताठ भूमिकाच त्यांनी घेतली आहे.
फुणगूस आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रांतर्गत सुमारे अठरा गावे समाविष्ट असून या भागात म्हणावे तसे खासगी उपचाराचे साधन नसल्याने या भागातील रुग्ण जनतेसाठी येथील आरोग्य केंद्र व त्या अख्त्यारील येणाऱ्या उपकेंद्रावर अवलंबून रहावे लागते. मात्र येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचा मनामानी कारभारामुळे रुग्ण जनतेला वेळेवर उपचार मिळणे व आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळणे दुरापस्त झाल्याने रुग्ण जनता अक्षरशः मेठाकुठीस आली आहे.
येथील आरोग्य तसेच हिवताप चे अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याने याचा मनस्ताप व जीवघेणा त्रास रुग्ण जनतेला बसत आहे. यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्यासंदर्भात कल्पना देऊन सुद्धा त्यात काहीच सुधारणा न होता मनमानी कारभाराचा अधिकच कहर झाला आहे. वरिष्ठ विभाग अधिकाऱ्यांचेही येथे वचक राहिलेला नाही. त्यामुळेच सर्व कारभार बेलगाम पद्धतीने सुरु आहे.
या संदर्भातील चौकशी तसेच कठोर कारवाई संदर्भातील मागणी घेऊन मिथुन निकम हे उपोषणाला बसले असून तोपर्यंत चौकशी आणि कारवाई चे सकारात्मक आश्वासन मिळत नाही तो पर्यंत उपोषणातून माघार नाही अशी भूमिका मिथुन निकम यांनी घेतली असून आज उपोषणस्थळी अनेकांनी जाऊन आपला पाठिंबा दिला आहे.

