(मुंबई)
अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाने गंभीर वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर तेहरानचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर जागतिक आर्थिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. जोखीम वाढल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळवला आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच स्पॉट गोल्ड 1.72 टक्क्यांनी वाढून 5,368 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये 2.58 टक्क्यांची उसळी दिसून येत दर 5,382 डॉलरवर गेले आहेत. हा गेल्या चार आठवड्यांतील उच्चांक मानला जातो. (एक ट्रॉय औंस सुमारे 31.10 ग्रॅम इतका असतो.)
भारतामध्ये सोन्याचा दर 10 ग्रॅमला 2 लाखांच्या जवळ?
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होण्याची शक्यता असून, लवकरच 10 ग्रॅम सोन्याचा दर 2 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चांदीही वेगाने महाग होत असून 1.68 टक्के वाढीसह 95.35 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. प्लॅटिनम 0.74 टक्के, तर पॅलेडियम 0.25 टक्क्यांनी वधारले आहे.
सोन्यात यंदा आतापर्यंत 20 टक्क्यांहून अधिक वाढ
सोन्याला पारंपरिकरित्या सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वाढीमागे अनेक कारणे आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी, गोल्ड ETF मध्ये वाढती गुंतवणूक आणि अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता यांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, अमेरिकेतील उत्पादक किंमत निर्देशांक (PPI) अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने महागाई पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच आठवड्यात जाहीर होणाऱ्या रोजगारविषयक महत्त्वाच्या आर्थिक अहवालांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
मध्यपूर्व तणावाचा भारताच्या सराफा आणि हिरे उद्योगावर फटका
मध्यपूर्वेतील संघर्ष वाढत राहिल्यास भारतात सोने आणि कच्च्या हिऱ्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुबईमार्गे होणारा पुरवठा विस्कळीत झाल्यास व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. दुबई हे भारतासाठी कच्च्या हिऱ्यांचे सर्वात मोठे केंद्र असून, सोन्याच्या बिस्किटांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार आहे.
भारत दरवर्षी सुमारे 800 ते 850 टन सोने आयात करतो. त्यापैकी 50 ते 60 टक्के सोने दुबईमार्गे येते. तसेच, देशातील हिरे पॉलिशिंग उद्योगासाठी लागणारे बहुतांश कच्चे हिरेही दुबईतूनच आयात होतात. सध्या हवाई मार्ग बंद असल्याने पुरवठ्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सात महिने सलग तेजी; 1973 नंतरचा विक्रम
जानेवारीच्या अखेरीस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा सोनं प्रति औंस 5,000 डॉलरच्या वर स्थिरावले आहे. सलग सातव्या महिन्यात सोन्याने वाढ नोंदवली असून, 1973 नंतरचा हा सर्वात दीर्घ तेजीचा कालावधी मानला जातो. राजकीय आणि व्यापारी तणाव, डॉलरच्या अवमूल्यनाची भीती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या स्वायत्ततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे सोन्याच्या किमतींना दीर्घकाळ आधार मिळत असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.
सोनं, चांदी आणि हिऱ्यांची वाहतूक ठप्प
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीमुळे सोनं, चांदी आणि कच्च्या हिऱ्यांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. इराण–अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या धोक्यामुळे अनेक अरब देशांनी हवाई मार्ग बंद करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम यूएई, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहारीन येथून होणाऱ्या सोनं आणि कच्च्या हिऱ्यांच्या पुरवठ्यावर झाला आहे. या देशांतून भारतासह आशियाई बाजारपेठांकडे जाणारी मौल्यवान धातू आणि रत्नांची वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जगातील प्रमुख सोन्याच्या व्यापार केंद्रांपैकी एक असलेल्या दुबई येथून होणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली असून, काही हवाई मार्गांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी प्रत्यक्ष सोन्याची आणि हिऱ्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. याशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी परिसरातील वाढता धोका लक्षात घेता समुद्री मार्गांवरही अनिश्चितता निर्माण झाली आहे. दुबईहून होर्मुझ मार्गे आशियाई किरकोळ बाजारपेठांमध्ये जाणारा सोन्याचा पुरवठा सध्या अडथळ्यात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर युद्धानंतर सोन्याच्या किमती आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडतील का, याबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. व्यापारी मार्ग बंद झाल्यामुळे सोनं आणि चांदीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम म्हणून काही ज्वेलर्सनी आधी दिलेल्या ऑर्डर अचानक रद्द केल्याचीही चर्चा आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये तीव्र चढउतार दिसू शकतात आणि भारतासारख्या आयात-निर्भर देशांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

