(दापोली)
कौटुंबिक वादातून एका मुलाने स्वतःच्या वयोवृद्ध वडिलांवर आणि सावत्र आईवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना दापोली तालुक्यातील करंजाणी-कातळवाडी येथे घडली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सुरेश आग्रे (वय ३७) हा दारूच्या नशेत घरी आला. वडिलांनी दुसरा विवाह केल्याचा राग मनात धरून त्याने सावत्र आई सुरेखा आग्रे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. हा वाद मिटविण्यासाठी पुढे आलेले वडील सुरेश श्रीपद आग्रे (वय ६७) यांनाही आरोपीने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातील फायबरची खुर्ची त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर दापोली पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

