(मुंबई)
लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या क्षुल्लक वादातून प्राध्यापक आलोककुमार अनिल सिंग (वय ३२) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओमकार शिंदे (वय २७) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत आलोक सिंग यांचे वडील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मालाड स्थानकात घडला प्रकार
ही घटना मालाड रेल्वे स्थानकावर घडली. लोकलमधून उतरताना झालेल्या वादानंतर आरोपी ओमकार शिंदे याने रागाच्या भरात खिशातील टोकदार चिमटा काढून आलोक सिंग यांच्या पोटात खुपसला आणि घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमेमुळे झालेल्या अतिरक्तस्त्रावात आलोक सिंग यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी अटकेत
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. आरोपी ओमकार शिंदे हा रोज मालाड ते चर्नी रोड दरम्यान लोकलने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मालाड स्थानकात सापळा रचून आरोपीला अटक केली.
आरोपीकडील हत्याराबाबत माहिती
पोलीस तपासात उघड झाले की, आरोपी ग्रँट रोड परिसरात इमिटेशन ज्वेलरीच्या व्यवसायात काम करतो. त्यामुळे त्याच्याकडे कामासाठी वापरण्यात येणारा टोकदार चिमटा बॅगेत होता. त्याच चिमट्याने त्याने आलोक सिंग यांच्यावर वार केला. हा वार चार ते पाच इंच खोलवर गेल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन मृत्यू झाला.
न्यायालयात बचाव पक्षाचा युक्तिवाद
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांनी हत्या करण्याचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद केला.
“गर्दीत इतर कुणाच्यातरी शस्त्रामुळे प्राध्यापकाला जखम झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फिर्यादीत चाकूने वार केल्याचा स्पष्ट उल्लेख नाही,” असे बचाव पक्षाने नमूद केले. तसेच, “उद्या लोकलमध्ये कोणी चिरडले गेले तर त्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
७ दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याने सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

