(रत्नागिरी)
दक्षिण आफ्रिकेत रविवारी पार पडलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ या दोन्ही धावपटूंनी ९० किलोमीटरची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यानच्या अत्यंत आव्हानात्मक ‘अप रन’ मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी पहिल्याच सहभागात ९ तास ५१ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. तर सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक आणि संगमेश्वर तालुक्यातील धामापूरचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करण्याचा मान मिळवला. त्यांनी ही स्पर्धा ११ तास २७ मिनिटांत पूर्ण केली.
रत्नागिरीच्या धावपटूंच्या जिद्दीची देशभर चर्चा
गतवर्षी प्रसाद देवस्थळी यांनी एकट्याने या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यंदा त्यांनी रत्नागिरीचे अभिजित पड्याळ यांनाही प्रेरित करत सोबत घेतले. दोघांनीही प्रचंड जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर ही अत्यंत कठीण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
दोघांच्या यशस्वी कामगिरीची माहिती समोर येताच रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल आणि टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या वतीने दोघांचे अभिनंदन करण्यात आले.
कोकणातील मॅरेथॉन स्पर्धांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न
कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी दक्षिण आफ्रिकेत जमलेल्या हजारो धावपटूंना रत्नागिरीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कोकण कोस्टल मॅरेथॉन’ आणि ‘गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. भविष्यात जगभरातील धावपटू कोकणातील या स्पर्धांकडे आकर्षित होतील, असा विश्वास सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
पालकमंत्री उदय सामंत यांचेकडून अभिनंदन
राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे अभिनंदन केले आहे. “कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनसारखी जागतिक आणि अत्यंत खडतर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. कोकणाच्या मातीत वाढलेल्या या दोन्ही धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांची कामगिरी जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,” असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

