(खेड / वार्ताहर)
जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अस्तान नं. १ येथील कब-बुलबुल विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
बौद्धिक स्पर्धेत कु. तृप्ती मनोज तांबे हिने प्रथम क्रमांक पटकावला. बुलबुल विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक, शारीरिक कवायत स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर हस्तकला स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक शाळेने मिळवले. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील या शाळेने जिल्हास्तरीय मेळाव्यात चॅम्पियन ट्रॉफी मिळवणे ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशामागे फ्लॉक लीडर श्रीम. अर्चना पालकर, उपशिक्षक भालेराव, राठोड, मुख्याध्यापक कार्ले तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. अनुष्का चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना शाळेने व्यक्त केली आहे.
जिल्हास्तरावरील या घवघवीत कामगिरीबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

