(दापोली /प्रतिनिधी)
फेरफार नोंद करून तक्रारदाराच्या नावे सातबाराचा उतारा व फेरफारची प्रमाणित प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना दापोलीतील नानटे सजाच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर त्यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयातील अभ्यागत कक्षात ही कारवाई पार पडली. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याच्या क्षणीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून बंडे यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी चे उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास रोकडे करीत आहेत. दरम्यान, महसूल विभागातील कामकाजात पारदर्शकता राखण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असताना अशा प्रकारची कारवाई उघडकीस आल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाचखोरीविरोधातील कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत तपास यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.

