(दापोली)
दापोली तालुकातील वनौशी तर्फे पंचनदी येथील भरणेवाडी रोडवर असलेल्या बंद घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ७२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप नारायण मयेकर (वय ६८, रा. विलेपार्ले) यांचे वनौशी तर्फे पंचनदी येथे ‘दुर्वांकुर निवास’ नावाचे घर आहे. मयेकर हे सेवानिवृत्त असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. २५ ऑक्टोबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत घर बंद असताना ही चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाची चावी वापरून कपाट उघडले व आतील लॉकर हत्याराने उचकटून त्यामधील रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या १२० नोटा, ५० रुपयांच्या १०० नोटा, १० रुपयांच्या १०० नोटा, १०० रुपयांच्या २० नोटा आणि २०० रुपयांच्या २० नोटांचा समावेश आहे.
या घटनेप्रकरणी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दाभोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दाभोळ पोलीस करत असून, परिसरातील बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

