(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आर्थिक ताणतणावाच्या कड्यावर उभी असलेली रत्नागिरी नगरपालिका आता नव्या पेचात सापडली आहे. सुमारे ३५ कोटी रुपयांच्या देण्यांचा डोंगर डोक्यावर असतानाच, १६ वा वित्त आयोग लागू केलेल्या जाचक अटींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या ‘कार्यप्रदर्शन अनुदाना’साठी पालिकेला स्वतःच्या महसुलात दरवर्षी किमान पाच टक्के वाढ दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी, शहरवासीयांवर करवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
पालिकेची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली असताना १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी आयोगाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीने ताण अधिकच वाढवला आहे. महसुलात दरवर्षी पाच टक्के वाढ न झाल्यास कोट्यवधी रुपयांच्या विशेष अनुदानावर पाणी सोडावे लागेल, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे. म्हणजेच, वाढ न दाखवल्यास अनुदान बंद असा सरळ इशाराच देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेने महसूलवाढीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. अलीकडील सर्वसाधारण सभेत दोन नव्या करांना मंजुरी देण्याचा निर्णय हा त्याच रणनीतीचा भाग मानला जातो. थकीत कर वसुलीसाठी कडक मोहीम, पाणीपट्टी व कचरा संकलन शुल्कात संभाव्य वाढ, नव्या बांधकामांवर अधिक काटेकोर करआकारणी, तसेच अनधिकृत नळजोडण्यांना अधिकृत करून करजाळ्यात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन २०२७-२८ ते २०३०-३१ या कालावधीत सुमारे ४६८०.५ कोटी रुपयांचा कार्यप्रदर्शन निधी निश्चित करण्यात आला आहे. या निधीतून हिस्सा मिळवण्यासाठी केवळ करवाढ पुरेशी ठरणार नाही, तर महसूलवाढीचे अचूक लेखापरीक्षणही अनिवार्य असेल. आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन केल्याशिवाय अनुदानाचा दरवाजा उघडणार नाही, हे स्पष्ट आहे.
नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रयुरी कदम यांनीही पाच टक्के वाढीची अट पूर्ण न झाल्यास संबंधित नगरपालिका अनुदानासाठी अपात्र ठरेल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे ३५ कोटींच्या देण्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या पालिकेसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे थकबाकीचा डोंगर फेडायचा, तर दुसरीकडे केंद्राच्या निधीसाठी महसूलवाढीची कसरत करायची. एकूणच, आर्थिक शिस्त आणि करवाढीच्या संगमावर उभी असलेली रत्नागिरी नगरपालिका येत्या काळात कठोर निर्णयांच्या मार्गावर जाण्याची चिन्हे आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम रत्नागिरी शहरवासीयांच्या खिशावर होणार, हे मात्र निर्विवाद आहे.

