( रत्नागिरी / वार्ताहर )
एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन निशाचर’अंतर्गत मध्यरात्री विशेष गुप्त मोहीम राबवली गेली. दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारपट्टीसमोर रायगड जिल्ह्यातील ‘एकवीरा दर्शन’ या एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेवर पथकाने कारवाई केली. याच वेळी परिसरातील अन्य दोन एलईडी मासेमारी नौका पथकाच्या तावडीतून निसटल्या; मात्र त्यांच्या नौकांवरील अवैध एलईडी दिव्यांचे नुकसान करण्यात पथकाला यश आले. समुद्रातील जोरदार वारे, उंच लाटा आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांनी रायगड जिल्ह्यातील काही नौका एलईडी दिव्यांचा वापर करून अवैध मासेमारी करत असल्याच्या तक्रारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत विभागाने गोपनीय नियोजन करून विशेष मोहीम आखली. विभागाची नियमित गस्ती नौका काही दिवसांपासून कार्यान्वित नसल्याने कारवाईत अडथळा येऊ नये, यासाठी मुंबई येथून पर्यायी गस्ती नौकेची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दापोली किनारपट्टी परिसरात मध्यरात्री ‘ऑपरेशन निशाचर’ राबविण्यात आले.
मोहिमेदरम्यान अंजर्ले किनारपट्टीसमोर एलईडी दिव्यांच्या मदतीने मासेमारी करणारी ‘एकवीरा दर्शन’ नौका पथकाच्या निदर्शनास आली आणि तिच्यावर कारवाई करण्यात आली. याच परिसरात आणखी दोन नौका एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करत असल्याचेही आढळले. समुद्रातील जोरदार वारे आणि प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत या दोन्ही नौका पळून जाण्यात यशस्वी झाल्या. मात्र, पथकाने तातडीने केलेल्या कारवाईत त्या नौकांवरील अवैध एलईडी दिव्यांचे नुकसान करण्यात आले.
या कारवाईत परवाना अधिकारी चिन्मय जोशी, स्वप्नील चव्हाण, पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक पुरुषोत्तम घवाळी आणि सागरी सुरक्षा रक्षक सचिन सुद यांनी सहभाग घेतला. मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अतिरिक्त आयुक्त महेश देवरे, सहआयुक्त नागनाथ भादुले आणि रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त जीवन सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असून, अनेक परवाना अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित कार्यक्षेत्राबरोबरच अतिरिक्त क्षेत्रांची जबाबदारीही सांभाळावी लागते. प्रशासकीय कामकाजाचा मोठा व्याप असतानाही अधिकारी प्रत्यक्ष समुद्रात गस्ती मोहिमेत सहभागी होत असल्याचे या कारवाईतून दिसून आले.
एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक आणि कायदेशीर पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मत्स्यसंपदेच्या संवर्धनावरही याचे दुष्परिणाम होऊ शकतात. स्थानिक मच्छीमारांचे हित जपणे, सागरी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि अवैध मासेमारीला प्रतिबंध घालणे यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


