(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील पऱ्याची आळी व गुरुकृपा मंगल कार्यालय परिसरात २०१६ साली घडलेल्या सैफुल्ला या फकीराच्या गोळीबार व खूनप्रकरणी अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी पुराव्याअभावी आरोपी रिजवान शेख याची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात बचाव पक्षाचे वकील ॲड संकेत घाग यांनी मांडलेला युक्तिवाद निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.
सरकार पक्षाच्या मांडणीनुसार, २९ जून २०१६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजता ही घटना घडली होती. आरोपी रिजवान शेख व मयत सैफुल्ला हे दोघेही रत्नागिरीत ‘फरिस्ते’ म्हणून भीक मागत फिरत होते. पैशांच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातूनच रिजवानने कट रचून सैफुल्लाचा पाठलाग करत गुरुकृपा मंगल कार्यालयासमोर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा आरोप होता. गंभीर जखमी अवस्थेत सैफुल्लाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत पळ काढल्याचा दावा होता. दुबे व अकबाणी या दोन साक्षीदारांनी आरोपीला घटनास्थळावरून पळताना पाहिल्याचे सांगितले होते. ओळख परेडीत त्यांनी रिजवानची ओळख पटविल्याचेही पोलिसांनी नमूद केले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी राजापूर जकात नाका येथे आरोपीला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडून गावठी कट्टा, काळा बुरखा व जिवंत काडतुसे जप्त केल्याचा दावा होता. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, मयताच्या शरीरातून काढण्यात आलेली गोळी जप्त शस्त्रातूनच झाडण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र बचाव पक्षाने या सर्व दाव्यांवर ठोस प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ॲड. संकेत घाग यांनी न्यायालयात सादर केलेल्या युक्तिवादात साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, पोलिस तपासातील त्रुटी आणि घटनाक्रमातील संदिग्ध बाबी अधोरेखित केल्या. ओळख परेड व साक्ष यामध्ये तफावत असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपीला राजापूर येथे अटक केल्याचा दावा संशयास्पद असल्याचेही त्यांनी मांडले.
याशिवाय, घटनेच्या रात्री काही फकिरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचा मुद्दा पुढे करत मूळ घटनाक्रम झाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बचाव पक्षाने केला. २०१६ साली संबंधित परिसरात पुरेशी प्रकाशयोजना होती का, यासारख्या मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. वैद्यकीय अहवाल व जप्त मुद्देमाल यामधील सुसंगततेअभावी सरकार पक्षाचा दावा कमकुवत ठरल्याचे प्रतिपादन करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुराव्यांच्या साखळीत ठोस व निर्विवाद दुवा आढळत नसल्याचे नमूद करत आरोपीची निर्दोष मुक्तता जाहीर केली. दशकभर चाललेल्या या खटल्याचा शेवट अखेर न्यायालयीन निर्णयाने झाला असून, या निकालाची शहरात चर्चा रंगली आहे.

