राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्षं मी संसार केलाय. तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी राजकारण आणि समाजकारणात कठीण असली तरी, सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या सहकार्यामुळे काहीही अशक्य नाही. हा सन्मान फक्त माझा नसून, तळागाळात कष्ट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनाही त्याचा अधिकार आहे, असे सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारतानाच स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, “प्रत्येक संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आपल्यासोबत नसला तरीही त्यांचे विचार, शिकवण आणि जिद्द पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे. आता केवळ पार्थ आणि जय हेच दोघे माझे कुटुंब नाही तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष माझा परिवार आहे.” असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला होता. आपल्या सर्वांचे नेते दादांच्या जाण्याने सर्वांनाच अपार दु:ख झाले आहे, पण त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. दादांची पोकळी कोणी भरू शकणार नाही, पण त्यांनी दाखवलेला मार्ग आणि कार्यकर्त्यांची जिद्द हीच यापुढे राष्ट्रवादीची खरी ताकद असेल.”
त्यांनी आपल्या भाषणात पक्षाची सामाजिक बांधिलकीही अधोरेखित केली. “शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी तडजोड न करता, समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करणे हे आमचे ध्येय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ताच राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आणि त्याच भावनेतून आम्हाला पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या यशस्वी प्रवासाची आठवण करून दिली, यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी संदेश दिला की, कोणालाही मागे राहू देऊ नका, झुकू नका, मातू नका. “माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आता आपल्याला एकत्र येऊन पक्षाला नव्या उंचीवर नेणे हेच आमचे प्राथमिक ध्येय आहे,” असे नमूद केले.

