(रायगड)
पनवेल तालुक्यातील माची प्रबळगड येथे २८ वर्षीय प्रीती संजू सिंग नावाच्या शिक्षिकेने गुरुवारी खोल दरीत उडी मारून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत महिला मूळ बिहारची रहिवासी असून सध्या नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १२ मध्ये राहत होती. विशेष म्हणजे, तिचं लग्न फक्त ५ दिवसांनी ३ मार्च रोजी ठरलेलं होतं.
प्रारंभिक तपासात घरगुती कारणामुळे रागाच्या भरात तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आत्महत्येच्या आधी तिने भावाला “गुडबायचा” मेसेज पाठवला होता.
पोलीसांनी पनवेल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतली. ती हालचाल नसलेल्या अवस्थेत आढळली. घनदाट जंगल, अरुंद पायवाटा आणि खोल दरीतून पोलिस आणि स्थानिक युवकांनी तिला शोधून रुग्णवाहिकेमधून हॅस्पिटलला नेलं, मात्र गंभीर दुखापत झाली असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. प्रबळगड हा भाग अत्यंत दुर्गम आणि निसरडा आहे. माची प्रबळगड परिसर उंच कडे, अरुंद पायवाटा आणि कोणतेही रेलिंग नसल्यामुळे धोकादायक मानला जातो.
या दु:खद घटनेमुळे लग्नाच्या तयारीने गजबजलेल्या घरावर अचानक शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

