(नाशिक)
कसारा रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी रात्री अचानक दरड कोसळल्यामुळे एक प्रवासी जखमी झाला असून काही वेळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि काही वेळातच मलबा हटवून ट्रॅक पुन्हा सुरळीत करण्यात आला.
दरड कोसळल्याची ही घटना केआरएसए (कसारा) स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ घडली. मुंबईहून कसाऱ्याकडे येणारी लोकल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत असताना ट्रॅकजवळील टेकडीवरून दरड कोसळली. ही दरड थेट गाडीच्या ५३०९/ए कोचमधील युनिट क्रमांक ४ वर येऊन पडली. दरम्यान, दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका पुरुष प्रवाशाच्या पायावर मलबा कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी प्रवाशाला तात्काळ कसारा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही प्रवाशांच्या माहितीनुसार, जखमी प्रवाशाच्या पायाला टाके पडले आहेत.
दरड कोसळल्यानंतर स्थानकावरील वैद्यकीय पथक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅकवरील मलबा हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आणि रात्री ९:३५ वाजता रेल्वे अभियंत्यांनी ट्रॅक सुरक्षित असल्याचे जाहीर केले. या गाडीत प्रवाशांची संख्या तुलनेने कमी होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा पार्श्वभूमीवर कसारा स्थानकाजवळ घडलेली ही घटना गंभीर असून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कसारा रेल्वे स्थानक हे नाशिक आणि मुंबई दरम्यानच्या महत्त्वाच्या मार्गावर असून या भागातून रोज हजारो नोकरदार प्रवास करतात. उपनगरीय गाड्यांची संख्या अपुरी असल्याने येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. विशेषतः सकाळी आणि रात्री कामाच्या वेळेत रेल्वेगाड्यांमध्ये तुफान गर्दी जाणवते. त्यामुळे अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी रेल्वे मार्गालगतच्या दरडींचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.