(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर सचिव आणि त्यानंतर गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून काम पाहिलेले आयएएस अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतरही त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
२२ ऑगस्ट २०२४ रोजी इकबाल सिंह चहल यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करून मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच त्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या वेळी सुजाता सौनिक यांच्याकडून तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. पुढील आदेश येईपर्यंत खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने मुंबई पोलीस दलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दर्जेदार निवासी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्प’ हाती घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नियोजन, भूसंपादन, विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय, पायाभूत सुविधा विकास, वित्तीय व्यवस्थापन आणि वेळेत अंमलबजावणी अशा अनेक गुंतागुंतीच्या बाबींचा समावेश आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वी आणि वेळेत अंमलबजावणीसाठी अनुभवी व सक्षम नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन, ३६ वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेले आणि प्रशासन व प्रकल्प व्यवस्थापनाचा व्यापक अनुभव असलेले इकबाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, १ फेब्रुवारी २०२६ पासून ते मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. ही नियुक्ती अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समकक्ष पद व दर्जाची असेल.
या निर्णयामुळे मुंबई पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांच्या निवास व कल्याणाशी संबंधित प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

