( नवी दिल्ली )
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने प्रवाशांसाठी तिकीट रद्द करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, विमान तिकीट बुक केल्यापासून ४८ तासांच्या आत रद्द केल्यास किंवा बदल केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. ही सुविधा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
यापूर्वी अनेक प्रवाशांना २४ किंवा ४८ तासांत प्रवास बदलल्यास किंवा रद्द केल्यास दंड भरावा लागायचा, जो अनेकदा अप्रत्याशित आर्थिक भार ठरत होता. नव्या नियमामुळे, प्रवासी आपल्या प्लॅन बदलल्यास किंवा तिकीट रद्द केल्यास आर्थिक ताण कमी होईल.
नवीन नियमांनुसार, विमान कंपन्यांना ४८ तासांचा “लूक-इन” पर्याय देणे अनिवार्य आहे. या कालावधीत प्रवासी तिकीट रद्द किंवा बदल करू शकतात आणि त्यावर कोणताही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही. तसेच, नावात किंवा तपशीलांमध्ये चूक झाल्यास बदल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक आणि आरामदायक होईल.
DGCA ने ही सुधारणा देशातील विमानसेवा अधिक पारदर्शक आणि प्रवास सुलभ होण्यासाठी केली आहे. या निर्णयामुळे प्रामुख्याने मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी विमान प्रवास अधिक परवडणारा आणि सुरक्षित होणार आहे.

