(मुंबई)
राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता संपले असून महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर वेगाने पुढे जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुवारी (26 फेब्रुवारी) विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी प्रगत आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे अंतिम ध्येय असल्याचे सांगितले.
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी अधोरेखित केली. अजित पवार यांनी नेहमीच विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले, असेही शिंदे यांनी नमूद केले.
2026 ‘भरती वर्ष’; रोजगाराला गती
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करत एकनाथ शिंदे यांनी 2026 हे वर्ष ‘भरती वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल, असे जाहीर केले. रिक्त पदे पारदर्शक पद्धतीने भरली जात असून आतापर्यंत 85 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल
औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम असल्याचे सांगत शिंदे यांनी राज्य आजही देशात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.5 टक्के आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने 1 लाख 64 हजार 875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली असून ती देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 39 टक्के आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रावरील जागतिक विश्वास दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
दावोस करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी
केवळ करारांपुरते न थांबता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच 91 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. दावोस येथे झालेल्या 30 लाख कोटींच्या करारांपैकी 82 टक्के करार अंमलबजावणीच्या टप्प्यावर असून एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात महाराष्ट्र मोठी झेप घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पायाभूत सुविधांमुळे बदलतोय राज्याचा चेहरा
मुंबईसह राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांचा उल्लेख करताना शिंदे यांनी वाढवण बंदर आणि जागतिक क्षमता केंद्र यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली. पालघरमधील वाढवण बंदरामुळे भविष्यात सुमारे 50 लाख रोजगारनिर्मिती होईल, असा दावा त्यांनी केला. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे दळणवळण अधिक वेगवान झाले असून उद्योगांना आवश्यक कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.
उद्योग राज्याच्या कानाकोपऱ्यात
विकास केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न ठेवता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे धोरण सरकारचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी 50 हजार कोटी, तर अहिल्यानगरमध्ये 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजीनगर शहर स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी म्हणून विकसित होत असून ते भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे मोठे हब बनेल, असा दावाही त्यांनी केला.
प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘जीपीआर 2.0’सारख्या उपक्रमांद्वारे सुधारणा सुरू असल्याचे सांगत, विकासकेंद्री धोरण, वेगवान पायाभूत सुविधा, मोठ्या गुंतवणुका आणि रोजगारनिर्मिती या चार मजबूत स्तंभांवर महाराष्ट्र पुढे जात असल्याचा ठाम दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून केला.

