( रत्नागिरी / वार्ताहर )
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, त्यांचे कार्य आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावना आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारी असून, सावरकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांमध्ये “राष्ट्राय स्वाहा” ही भावना म्हणजे वैयक्तिक स्वार्थ, सुख-दुःख किंवा हित यापेक्षा राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणे. देशाच्या स्वातंत्र्य, सुरक्षा, प्रगती आणि गौरवासाठी आवश्यक असेल ते सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा या संकल्पनेतून व्यक्त होते. ही संकल्पना त्याग, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानली जाते.
रत्नागिरी येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि खल्वायन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आलेल्या ‘विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : क्रांतीची धगधगती ज्वाला’ या संगीत, नृत्य आणि नाट्यमय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रशांत यादव, कार्यक्रमाचे लेखक श्रीकृष्ण जोशी, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, अभिनेते सुशांत शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना मंत्री शेलार म्हणाले, “सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते उत्कृष्ट लेखक, कवी, नाटककार आणि मराठी तसेच हिंदी साहित्य समृद्ध करणारे शब्दशिल्पी होते. अंदमानातील काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगतानाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा नव्या पिढीने पुढे नेणे ही काळाची गरज आहे.”
लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाचा पुढाकार
यावेळी बोलताना शेलार यांनी राज्यातील लोककला आणि सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. लोककलांच्या आयोजनासाठी आणि संवर्धनासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून, महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी दिल्यानंतर महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे सांगत, “आम्ही केवळ ३०० किंवा ४०० कार्यक्रमांचे आयोजन करत नाही, तर वर्षातील ३६५ दिवस राज्यभरात सुमारे १,२०० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावरकरांच्या वास्तव्यावरील पुस्तकाची भेट
शिरगाव येथील मोरेश्वर दामले यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर काही काळ वास्तव्यास होते. या ऐतिहासिक संदर्भावर आधारित त्यांचे नातू रविंद्र दामले यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत मंत्री आशिष शेलार यांना यावेळी भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित संगीत, नृत्य आणि नाट्यमय सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला रसिक, नागरिक आणि सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

