(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कात्रज परिसरात 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरिफ सय्यद या खाजगी क्लास चालकाला नागरिकांनी पकडून चोप दिला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आंबेगाव पठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लहानपणापासून शिकत असल्याने होती कौटुंबिक ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नियमितपणे कात्रजमधील आरिफ सय्यद यांच्या रोबोटिक्स और कंप्यूटर क्लासला जात होती. ती लहानपणापासूनच त्याच्याकडे शिकत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये ओळख होती. पोलिसांच्या माहितीनुसार, याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. मागील काही महिन्यांपासून ऑनलाइन क्लासदरम्यान माऊस किंवा की-बोर्ड वापरताना तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. मात्र, ओळखीचे शिक्षक असल्याने सुरुवातीला मुलीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.
“खूप रात्र झाली आहे, इथेच झोप…” आणि पुढे धक्कादायक प्रकार
अंदाजे तीन ते चार आठवड्यांपूर्वी पीडित मुलगी ऑनलाइन मदरसा क्लाससाठी आरोपीच्या घरी गेली होती. क्लास रात्री उशिरा संपल्याने “रात्र झाली आहे, इथेच झोप, सकाळी लवकर घरी सोडतो,” असे आरोपीने सांगितल्याचा आरोप आहे. घरात आरोपीची मुलगी आणि काहीवेळा इतर विद्यार्थीही राहत असल्याने मुलगी आणि तिच्या वडिलांना काही संशय आला नाही. रात्री सर्वजण हॉलमध्ये झोपले असताना मध्यरात्री कोणीतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे मुलीला जाणवले. जागी झाल्यावर शेजारी क्लास चालक आरोपी बसलेला दिसल्याने ती घाबरून गेली, असे तक्रारीत म्हटले आहे.
भिंतीला लागून मी झोपले होते. माझ्या बाजूला सरांची मुलगी, नंतर तिची मैत्रीण, नंतर सरांचा मुलगा आणि सर असे झोपलो होतो. मला झोप लागल्यानंतर मध्यरात्री माझे जवळ कोणीतरी येऊन माझ्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे मला जाणवले, तेव्हा मी या अचानक होणाऱ्याया प्रकारामुळे दचकून जागी झाले. तेव्हा माझे शेजारी सर बसल्याचे दिसले. मी घाबरुन उठले आणि त्यांचेकडे पाहिल्यावर ते तेथून निघून गेले. माझी छाती धडधडायला लागली, मला खूप रडू येऊ लागले. परंतु सगळेजण झोपले असल्याने मी रात्रभर तशीच बसून काढली, असे पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले.
वागण्यात बदल; बहिणीला सांगितली आपबीती
या घटनेनंतर मुलगी मानसिक धक्क्यात गेली होती. ती शांत राहू लागल्याने मोठ्या बहिणीला संशय आला. विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर मुलीने संपूर्ण प्रकार रडत रडत सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. मुलीसोबत घडलेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी पालक आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपीने चूक झाल्याची कबुली दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा प्रकार समजताच परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि आरोपीला मारहाण केली. यानंतर आंबेगाव पठार पोलिसांना बोलावून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी आरिफ सय्यद याच्याविरुद्ध POCSO कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवावी, मुलांना सुरक्षित वातावरण द्यावे आणि संशयास्पद वर्तन आढळल्यास त्वरित कुटुंबीयांना माहिती द्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

