(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र या कार्यक्रमाला पार्थ पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
राज्यसभेसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटी बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील सात रिक्त जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी 37 मतांची गरज असते तर त्यांच्याकडे 40 आमदार असून ते पार्थ पवार यांना मतदान करणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
या निर्णयामुळे पार्थ पवार यांना राज्यातील राजकारणाऐवजी थेट दिल्लीतील संसदीय राजकारणात काम करण्याची संधी मिळणार आहे. पक्षात त्यांना भविष्यात अधिक महत्त्वाची भूमिका दिली जाईल, असा संकेतही या निर्णयातून मिळतो.
अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण, उमेदवारीने पडदा
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमात पार्थ पवार गैरहजर राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. संघटनेत त्यांना मोठी जबाबदारी, विशेषतः राष्ट्रीय महासचिवपद दिले जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र महत्त्वाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित न राहिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रफुल पटेल यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी पार्थ पवार यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
पार्थ पवार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
- 2019 मध्ये राजकारणात प्रवेश: 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून सक्रिय राजकारणात पाऊल
- पहिली निवडणूक: मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली
- पराभवाचा अनुभव: शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव
- संघटनात्मक कामावर भर: त्यानंतर थेट निवडणूक न लढवता पक्ष संघटन, प्रचार नियोजन आणि रणनीतीमध्ये सक्रिय सहभाग
- पडद्यामागील भूमिका: महत्त्वाच्या बैठका आणि निर्णयप्रक्रियेत सातत्याने सहभाग
दिल्लीतील नवी इनिंग
राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवार संसदीय राजकारणात नवी सुरुवात करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील पिढीच्या नेतृत्वात त्यांची भूमिका अधिक ठळक होण्याची शक्यता असून, दिल्लीतील राजकारणात त्यांचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्रातून कोणते राज्यसभा सदस्य निवृत्त होणार?
- शरद पवार
- रामदास आठवले
- फौजिया खान
- प्रियांका चतुर्वेदी
- धैर्यशील पाटील
- रजनी पाटील
- भागवत कराड
राज्यसभा निवडणूक कधी?
राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही होळीनंतर 5 मार्च आहे. त्यानंतर 6 मार्चला अर्जाची छाननी होणार आहे. तर 9 मार्च उमेदवारी मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. मग राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान 16 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 5 नंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

