(सावर्डे / वार्ताहर)
देवरुख येथे नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी चॅम्पियनशिप तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये सावर्डेच्या अमेय शहानुर तायक्वांदो क्लबने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडली. क्लबच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत पदके मिळवत उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटातील राष्ट्रीय खेळाडू ऋतुज मते याने दमदार खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. या शानदार यशामुळे त्याची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय १४ वर्षांखालील गटात मयुरेश लाड, विहान सुर्वे आणि प्रद्युम्न सुवरे यांनी प्रत्येकी कांस्यपदक जिंकत क्लबच्या यशात मोलाची भर घातली.
अमेय शहानुर तायक्वांदो क्लब, सावर्डेच्या एकूण दहा खेळाडूंनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर चिपळूण तालुक्याने जिल्हा चॅम्पियनशिपचा किताबही पटकावला, ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली.
या यशामागे क्लबचे प्रशिक्षक भरत कररा आणि रुद्र सर यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मेहनत आणि मार्गदर्शन लाभल्याचे खेळाडूंनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सावर्डे पंचक्रोशीसह संपूर्ण चिपळूण तालुक्यातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेय अकॅडमी, सावर्डेच्या संचालिका सौ. वृषाली रामचंद्र नांदिवडेकर यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी भविष्यातही अशाच यशस्वी कामगिरीद्वारे सावर्डे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला.

