( मुंबई )
महाराष्ट्र विधानसभेतील महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी दणदणीत आणि विक्रमी विजय मिळवला आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा मतदाधिक्याचा विक्रम मोडीत काढत बारामतीमधील पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. 2 लाख 18 हजार 930 मतं मिळवून सुनेत्रा पवारांनी विजय मिळवला आहे. सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या नावावर सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानले. “मतदारसंघातील जनतेने दाखवलेला विश्वास, प्रेम आणि भक्कम पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे,” असे त्या म्हणाल्या. या निवडणुकीतील जनादेशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “हा कौल अजितदादांच्या पवित्र स्मृतींना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. निर्धार, संघर्ष आणि नव्या बारामतीच्या उभारणीसाठी ही नव्या प्रवासाची सुरुवात आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाची उणीव प्रकर्षाने जाणवते, मात्र त्यांच्या विचारांवर चालत विकासाचा वेग कायम ठेवला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
विजयासोबत जबाबदारीची जाणीव
या यशासोबत मोठी जबाबदारी येत असल्याचे अधोरेखित करत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मधील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
‘अजितदादांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार’
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष, तसेच विविध संस्था आणि संघटनांचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत यशवंतराव चव्हाण आणि अजित पवार यांनी दाखवलेल्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“कामातूनच विजय साजरा करा”
तरुण, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. “निवडणुका येतात आणि जातात, मात्र बारामतीतील सलोखा कायम राहावा,” असे सांगत कोणताही जल्लोष न करता कामातूनच विजय साजरा करण्याचा संदेश त्यांनी दिला.
बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव त्यांच्या सुख-दुःखात उभे राहू, अशी ग्वाही देत त्यांनी विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला.

