( गुहागर / वार्ताहर )
गुहागर तालुक्यातील एकमेव पी.एम.श्री मानांकन प्राप्त पी.एम.श्री वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आज (गुरुवार, १६ जुलै २०२६) सकाळी ११ वाजता पी.एम.श्री हरित शाळा उपक्रमांतर्गत ‘प्रसिद्ध तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान (Expert Talk)’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी आणि साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची दुर्मीळ संधी मिळणार असून, त्यांच्या मनात साहित्याची गोडी, वाचनाची आवड आणि सर्जनशील लेखनाची प्रेरणा रुजविण्याचा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद व ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागरचे अध्यक्ष तसेच इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट असलेले ज्येष्ठ कवी-साहित्यिक राजेंद्र आरेकर सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील कवितेमागील विचार, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया आणि लेखनाचा प्रवास जाणून घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमात प्रा. मनाली बावधनकर (लेखिका, निवेदिका व कीर्तनकार), सोनाली घाडे (ग्रंथपाल, ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागर), ज्ञानेश्वर झगडे (कवी), ईश्वर हलगरे (कवी), सुधाकर कांबळे (सेवानिवृत्त प्राचार्य) तसेच डॉ. मनोज पाटील (लेखक व बालभारती सदस्य) हे मान्यवर विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. साहित्यनिर्मिती, वाचन संस्कृती, भाषेचे जतन, लेखनकौशल्य, कल्पनाशक्तीचा विकास आणि विद्यार्थ्यांनी प्रभावी लेखन कसे करावे याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.
या संवादात्मक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मान्यवर साहित्यिकांना थेट प्रश्न विचारण्याची संधीही मिळणार आहे. साहित्य, कविता, कथा, पुस्तक लेखन, वाचन संस्कृती आणि भाषिक अभिव्यक्ती याबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात येणार असून, त्यांच्यात सर्जनशील विचारांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही या साहित्यिक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री. सतीश नलावडे, पदवीधर शिक्षक श्री. बिपिन विचारे,सौ. शैलजा साळे उपशिक्षक श्री बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सौ. सुलक्षणा करडे-राशिनकर, सौ. भारती गोवेकर- वावरे, शिक्षण सेविका सौ. प्रियांका पवार, सौ. अंजूम शेख, सौ. तेजस्विनी जगताप, सहायक शिक्षिका कु. आकांक्षा खरे, कु. साक्षी खरे यांनी केले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, समितीचे सर्व सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर यांनीही या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला असून परिसरातील विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
पी.एम.श्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ व्याख्यानापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, भाषिक कौशल्य विकसित करणे, साहित्याविषयी आत्मीयता निर्माण करणे आणि सर्जनशील विचारांना चालना देणे हा त्यामागील व्यापक हेतू आहे.
साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची दुर्मीळ संधी मिळणार असल्याने परिसरातील विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

