(मुंबई)
अखिलेश यादव यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्या मराठीच्या भूमिकेवर भाष्य करताना तो मतांसाठीचा मार्ग असू शकतो, मात्र अशा विभाजनातून देश किंवा समाज निर्माण होत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, “राज ठाकरेंप्रमाणे आम्हीही उत्तर प्रदेशात गुजरात किंवा इतर राज्यांतील लोकांना येण्यास बंदी घातली तर ते निवडणूक कुठून लढवतील? जर नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली नाही तर ते कुठे जातील? त्यांना महाराष्ट्रातून निवडणूक लढवू दिली जाईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगाने निष्पक्ष राहावे
चार राज्यांतील आगामी निवडणुकांबाबत बोलताना अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे निवडणुका पार पाडाव्यात, असे सांगितले. आयोगाने कोणत्याही पक्षाची कठपुतळी न बनता आपली विश्वासार्हता सिद्ध करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील निवडणुकीदरम्यान भाजपने मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले, असा आरोप आहे. त्या वेळी आयोगाने डोळेझाक केल्यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे. आता स्वतःची विश्वासार्हता सिद्ध करण्याची संधी आयोगासमोर आहे.
गॅस तुटवड्यावरून केंद्र सरकारवर टीका
देशभर जाणवत असलेल्या गॅस सिलेंडर तुटवड्यावरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मुंबईसारख्या समुद्रकिनारी असलेल्या शहरातही गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. “उत्तर प्रदेशात सिलेंडर ऑनलाईन बुक करताना एरर येते. तंत्रज्ञानाची ही अवस्था झाली आहे. पंतप्रधान मोदींकडे देशाला विश्वगुरू बनवण्याची संधी होती, पण ती गमावली गेली,” असेही त्यांनी म्हटले.
योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना अखिलेश यादव म्हणाले की, दावोस येथे शेवटच्या क्षणी एमओयू साइन करण्यात आले. त्यांच्या मते, महाराष्ट्राच्या धर्तीवरच उत्तर प्रदेश सरकारनेही उद्योगपतींना बाहेर नेऊन करार केले. समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात झालेल्या अनेक करारांवरच पुन्हा सही करून ते नवीन असल्याप्रमाणे सादर करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

