(मुंबई / प्रतिनिधी)
कोकणातील प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याच्या मोहोराला मोठी झळ बसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंचनामे तातडीने करून बाधित बागायतदारांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधान परिषदेत दिली.
कोकणातील आंबा उत्पादकांच्या आर्थिक व मानसिक तणावाचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. मोहोर काळवंडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करत तातडीच्या मदतीची मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान सुनील शिंदे आणि भाई जगताप यांनीही हस्तक्षेप करत आंबा बागायतदारांना पीक विम्यांतर्गत लाभ देण्याबरोबरच वाढीव भरपाई जाहीर करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री गोगावले यांनी सांगितले की, २०२५ मधील नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणाला झालेल्या नुकसानीपोटी आतापर्यंत ८६.७६ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
आंब्याबरोबरच काजू, फणस आणि कोकम या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणानुसार नाशवंत फळपिकांना हमीभाव देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या विषयावरील मर्यादाही अधोरेखित केल्या. अवकाळी पावसाच्या फटक्याने आधीच चिंतेत असलेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना या आश्वासनामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पंचनामे आणि भरपाईची प्रक्रिया प्रत्यक्षात किती वेगाने राबवली जाते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

