(रत्नागिरी)
राज्य शासनाच्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) ई-केवायसी मोहिमेला जिल्ह्यात वेग आला असून, रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने आतापर्यंत ९२ बोगस शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. गरीबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ बिनधास्तपणे घेत असलेल्या उच्चभ्रू वर्गाच्या मुसक्या आवळण्याचा हा प्रयत्न असल्याचे चित्र आहे.
शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेंतर्गत बोगस लाभार्थ्यांना हटवण्यासाठी आधार क्रमांकाच्या आधारे ई-केवायसी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मे २०२५ अखेर एकूण ४ लाख ४५ हजार ३१९ शिधापत्रिकांची नोंद झाली आहे. यामध्ये ५५६ नवीन कार्डे वितरित करण्यात आली असून, दुसरीकडे विविध कारणांमुळे ९२ कार्डे रद्द करण्यात आली आहेत.
रद्द करण्यात आलेल्या कार्डांमध्ये शुभ्र प्रकारातील २३, केशरी (एनपीएच) प्रकारातील २९, तर केशरी (पीएचएच) प्रकारातील १२ शिधापत्रिकांचा समावेश आहे. या मोहिमेची पुढील टप्प्यातील कारवाई अधिक व्यापक आणि काटेकोरपणे केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यभरात आतापर्यंत तब्बल १८ लाख रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे गरीबांपर्यंत अन्नधान्याचा न्याय्य वाटा पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न अधिक प्रभावी होतो आहे.