(रत्नागिरी /प्रतिनिधी)
एका गुन्ह्याप्रकरणी पोलिस कारवाईनंतर अटकेत राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित शिक्षक ४८ तासांहून अधिक काळ पोलिस कोठडीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद गाणे शाळा येथील पदवीधर शिक्षक सतीश जाधव यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ही घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली. त्या काळात संबंधित शिक्षकाने रजेचा अर्ज सादर केला होता. दरम्यान, शिक्षक अटकेत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित कागदपत्रांची मागणी केली. पडताळणीत गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस कारवाईची माहिती प्रशासनापासून लपविल्याचा मुद्दाही यावेळी पुढे आला. शासकीय नियमांनुसार ४८ तासांपेक्षा अधिक काळ अटकेत राहिलेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणे बंधनकारक असते. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून, त्याबाबतचे आदेश बुधवारी निर्गमित करण्यात आले.
पंधरवड्यापूर्वी राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील एका शिक्षकाच्या अटकेनंतरही तत्सम कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच ही दुसरी घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिक्षकवर्गाच्या वर्तणुकीबाबत अधिक काटेकोर निरीक्षणाची गरज अधोरेखित होत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगू लागली आहे.

