(रत्नागिरी)
विद्यार्थ्यांसाठी २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता भाट्ये बीच येथे High Altitude Balloon (HAB) चे प्रत्यक्ष प्रक्षेपण होणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रक्षेपण, ट्रॅकिंग, वैज्ञानिक डेटा संकलन आणि डेटा पुनर्प्राप्तीची प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवता येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शिक्षणविषयक सकारात्मक भूमिकेमुळे गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ५० ग्रामीण विद्यार्थ्यांना NASA आणि ISRO येथे शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या संधी मिळाव्यात या हेतूने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी CSR अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अंतराळ संशोधनाकडे पुढील भक्कम पाऊल
अभ्यासदौऱ्यांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने या चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अंतराळ विज्ञानाची मूलतत्त्वे, उपग्रह प्रणाली, कक्षीय रचना, सेन्सर आणि पेलोड इंटिग्रेशन, उपग्रह मॉडेलिंग तसेच डेटा संकलन यांचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणातील मुख्य आकर्षण म्हणजे HAB चे प्रत्यक्ष प्रक्षेपण.
हा उपक्रम जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढाकारातून, Silicon Techhills Research Foundation, सातारा आणि Gruha Space, बेंगळुरू यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्रातील पहिल्यावहिला उपक्रम ठरत असून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे.

