(रत्नागिरी / वार्ताहर)
कराटे असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी ३० एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवड चाचणीत जिल्ह्यातील विविध वयोगटांतील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
सदर राज्यस्तरीय कराटे स्पर्धा कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक येथील डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आडगाव नाका येथे आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील निवड झालेल्या खेळाडूंची कामगिरी पुढीलप्रमाणे :
सब-ज्युनिअर गटातील ४० किलोखालील वजन गटात कुमार ओम राजेंद्र शिर्के यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर ५४ किलोखालील वजन गटात कुमारी सावरी संजय राठोड हिने प्रथम क्रमांक मिळविला.
कॅडेट गटातील ५२ किलोखालील वजन गटात कुमार कार्तिक प्रकाश राठोड, तसेच ५७ किलोखालील वजन गटात कुमार ध्रुव धनंजय बसणकर यांनी अव्वल स्थान मिळविले.
ज्युनिअर गटातील ४८ किलोखालील वजन गटात कुमारी रिया मंगेश माचकर हिने प्रथम क्रमांक पटकावत आपली छाप उमटवली.
या सर्व खेळाडूंना कराटे असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष व प्रशिक्षक जावेद ह. मिरकर, सचिव सुरज वी. बने आणि खजिनदार अरुण जु. बेग यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व कराटेपटूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राज्यस्तरावरही हे खेळाडू उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

