(चिपळूण)
कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य-दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी किमान ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी ठोस मागणी आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील इतिहास हा केवळ स्थानिक नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र व हिंदवी स्वराज्याच्या वारशाशी जोडलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष, त्याग आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून या स्थळाची ऐतिहासिक ओळख जतन करणे अत्यावश्यक आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय उपस्थित करून शासनस्तरावर चर्चा करण्यात आली होती, असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांनी कसबा येथील स्मारकासाठी सुमारे ३१३ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करून शासनाकडे सादर केला आहे. सुमारे ५ एकर विद्यमान जागा आणि नियोजित १०० एकर परिसर संपादित करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी कोकणवासीयांची मागणी आहे. हे स्मारक होणे हा येथील जनतेसाठी केवळ विकास नव्हे, तर भावनिक जिव्हाळ्याचा विषय आहे.
या प्रस्तावित स्मारक स्थळाची पाहणी २७ एप्रिल २०२५ रोजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसमवेत केली होती. त्या वेळी स्मारक उभारणीस सकारात्मक भूमिका दर्शवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची स्व. अजितदादा पवार यांची मनापासून इच्छा होती, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
यासोबतच शास्त्रीपुल ते शृंगारपूर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मार्गाचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे. शृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराजांचे सासरवाडीचे स्थान असून या मार्गावर मालोची राजे घोरपडे कारभाटले यांची समाधी आहे. या सर्व स्थळांचा राष्ट्रीय दर्जाने विकास केल्यास ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते.
कसबा परिसरात सुमारे ३०० पुरातन मंदिरे असून, त्या संपूर्ण भागाचा एकात्मिक विकास आराखडा राबविल्यास सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र उभे राहू शकते. तसेच स्मारकाजवळ शास्त्री नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने ६६ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर केले आहे.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५-२६ मध्ये या दोन्ही आराखड्यांना मान्यता देऊन टप्प्याटप्प्याने आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीस लवकरात लवकर प्रारंभ करता येईल, अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली आहे.
या वेळी आमदार संग्रामभैया जगताप, आमदार सुनील शेळके, आमदार संजय खोडके, माजी आमदार राजेश पाटील, देवेंद्र भुयार, प्रकाश आजबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

