(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात हिंद दी चादर श्री गुरुदेव बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सदरचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कोकण विभाग व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबवण्यात आला.
श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांची देशनिष्ठा, स्वाभिमान, तत्वनिष्ठा, त्याग याविषयी जीवन परिचय तसेच चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर समूहगीत गायन, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा असे कार्यक्रमांचे शालेय स्तरावर नियोजन करण्यात आले. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जाकादेवी विद्यालयातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी परिसरामध्ये जाकादेवीतील शालेय विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या मोहिमेत विद्यार्थी व स्वच्छता मोहीम विभागाचे प्रमुख संदेश सोनवडकर, क्रीडा शिक्षक किशोर नलवडे, कलाशिक्षक प्रणित जाधव, केशव राठोड, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मीना संपत यांनी खास अभिनंदन केले.

