(चिपळूण)
सावकारी धंद्यानी पुन्हा डोके वर काढले असून पोलिसांची व्याजाची रक्कम १ लाख ४५ हजार रुपये दर महिना भरण्यास नकार दिल्याने यातूनच एका सावकाराने कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी सोमवारी सावर्डे पोलीस ठाण्यात सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव भालचंद्र सावंत असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद स्वानंद शांताराम बांबाडे (३८) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वानंद बांबाडे यांचे सावर्डे बाजारपेठ येथे कपड्याचे दुकान आहे. कोरोना कालावधीत दुकान बंद असल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले. त्याच्या ओळखीचा वैभव सावंत हा व्याजी पैसे देण्याबाबत व्यवहार करत असल्याबाबत माहित असल्याने बांबाडे यांनी वैभव याच्याकडून सप्टेंबर २०२१मध्ये पहिल्या आठवड्यात ५०,००० रुपये १० टक्के व्याजदराने घेतले होते.
त्यानंतर त्यांनी सप्टेंबर २०२१ ते २३ नोव्हेंबर २०२४ याकालावधीत ३७ लाख रुपये फोन पे, गुगल पे, योनो, फिनो ॲपव्दारे तसेच रोख रक्कम दिलेली आहे. मात्र वैभव हा अजूनही व्याजाची रक्कम शिल्लक असल्याचे सांगून दर महिना १ लाख ४५ हजार रुपये मागत होता. बांबाडे यांना ही रक्कम देणे शक्य नसल्याने तसा नकार त्यांनी वैभव याला दिला. त्यावेळी वैभव यांने बांबाडे यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी व घरी जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धमकी देण्याचा प्रकार पुढे आल्यानंतर याप्रकरणी बांबाडे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.