(चिपळूण)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुःखद अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी व्यक्त केली आहे.
येत्या १ मार्च २०२६ रोजी आमदार शेखर निकम यांचा वाढदिवस असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी यंदा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी कोणताही सत्कार स्वीकारणे, शुभेच्छा घेणे किंवा कार्यक्रम आयोजित करणे आपल्या मनाला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अजितदादांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करत आमदार निकम यांनी आपल्या सर्व मतदार बंधू-भगिनींना आणि हितचिंतकांना नम्र आवाहन केले आहे की, कोणतेही बॅनर, पोस्टर, जाहिरात किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी त्या दिवशी अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करून समाजहिताचे एखादे विधायक कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संवेदनशीलता, संयम आणि सामाजिक भान यांचा संदेश गेल्याचे दिसून येत असून, अनेकांनी आमदार शेखर निकम यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

