(रायगड)
कर्जत तालुक्यातील हंबरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तुंगी गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या बांधकामात १२ वर्षीय ओंकार उर्फ मुक्या भरत आसवले या निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुरक्षा उपायांचा अभाव की प्रशासनाची हलगर्जी, असा थेट सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
सुरक्षा व्यवस्था नसल्याचा गंभीर आरोप
तुंगी हे डोंगराळ व दुर्गम गाव अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित होते. अलीकडेच येथे रस्ता आणि वीज पोहोचली असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत तलावाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तलावात सुमारे १५ फूट पाणी साचलेले असतानाही कोणतेही सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा संरक्षक जाळी बसवण्यात आलेली नव्हती. सुरू असलेले खोदकाम आणि निसरड्या पायवाटा यामुळे परिसर अधिक धोकादायक बनला होता.
शोधमोहीमेनंतर सकाळी मृतदेह आढळला
दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ओंकार हा गावालगतच्या तलाव परिसरात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत काहीच माहिती न मिळाल्याने चिंता वाढत गेली. अखेर दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचा मृतदेह तलावात आढळून आला.
या घटनेने आसवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात आहे. “काम सुरू असताना मूलभूत सुरक्षा उपाय का करण्यात आले नाहीत?” असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. दोषींवर तात्काळ कारवाई करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व विकासकामांमध्ये कडक सुरक्षा नियम लागू करावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ही घटना विकासकामांमधील सुरक्षिततेकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा गंभीर इशारा मानली जात असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

