(मुंबई)
भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या मतदारसंघातून त्यांनी अगोदर पासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र, महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. शिंदेंची शिवसेनाही या जागेवरील आपला दावा सोडण्यास तयार नाही. वैभव नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याचे चित्र असताना वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या हालाचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. भेटीदरम्यान निलेश राणेंनी कुडाळ-मालवणमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये संभाव्य लढतीची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 पैकी 2 विधानसभा भाजप, तर एक जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचंही चित्र आहे. भाजपच्या दोन जागांपैकी कणकवलीच्या जागेवर नितेश राणेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निलेश राणेंना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. दरम्यान, निलेश राणे हाती धनुष्य घेत 23 ऑक्टोबरला शिवसेना पक्षात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात आहे. 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदर्ग दौ-यावर असतील. त्यावेळी निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल तर निलेश राणेंच्या पाठीमागे महायुती म्हणून खंबीरपणे उभं राहणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भाजपचे निलेश राणे लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगलेय. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले केलं आहे. निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र युतीमध्ये एकमेकाचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. आमची युती एवढी घट्ट आहे की यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील, अशी भूमिकाही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.
निलेश राणे हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार झाले होते. 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ-मालवणमधून लढण्यास इच्छुक आहेत. कोकण राखण्यासाठी महायुतीतर्फे निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण देण्याची व्युव्हरचना आखली जाण्याची शक्यता आहे.