वजन वाढलं की आपण लगेच बैठं काम, जास्त खाणं किंवा व्यायामाचा अभाव यालाच जबाबदार धरतो. पण तज्ज्ञांच्या मते, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक ताण म्हणजेच स्ट्रेस हे वजन वाढण्यामागचं एक मोठं आणि दुर्लक्षित कारण ठरत आहे.
सध्या नोकरीचा ताण, टार्गेट्स पूर्ण करण्याची धावपळ, घरातील जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण आणि करिअरची स्पर्धा यामुळे अनेक जण सतत तणावाखाली असतात. हा तणाव केवळ मानसिक आरोग्यावरच नाही, तर शरीरावरही थेट परिणाम करतो.
तणावामुळे वजन कसं वाढतं?
जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये असते, तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन जास्त प्रमाणात स्रवतो. हा हार्मोन रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवतो आणि अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवण्यास मदत करतो. याचा परिणाम प्रामुख्याने पोटाभोवती चरबी वाढण्यात दिसून येतो.
यासोबतच इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. त्यामुळे रक्तातील साखर योग्य प्रकारे वापरली जात नाही आणि शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. काही लोकांमध्ये मान किंवा काखेजवळ काळसर डाग दिसू लागतात. ही लक्षणे शरीरातील बदलांची सूचना देतात.
रात्री उशीरापर्यंत जागणे आणि तणावाखाली काम करीत राहण्याने शरीरातल्या काही यंत्रणांवर दबाव येतो. हा दबाव आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो. रात्रीच्या जागरणाचा हा परिणाम कमी करण्यासाठी कितीही व्यायाम केला तरीही काही उपयोग होत नाही. कारण जागरण करणे हा निसर्गाशी विसंगत असा व्यवहार असतोे. निसर्गाने आपल्याला रात्र झाली की झोपायला सांगितले आहे. पण आपण रात्री झोपण्याऐवजी काम करीत बसतो त्यामुळे शरीरातल्या चयापचय क्रिया बाधित होतात आणि त्याचा परिणाम शरीराच्या वजनावर होतो. तेव्हा वजन कमी करण्याच्या उपायात रात्री लवकर झोपणे, रात्री काम न करणे आणि पुरेशी झोप घेणे याही गोष्टींचा समावेश केला गेला पाहिजे.
स्ट्रेस इटिंगमुळे वाढतो धोका
तणावाच्या काळात वजन वाढेल की कमी होईल, हे पूर्णपणे व्यक्तीच्या सवयींवर अवलंबून असतं.
- काही जण स्ट्रेस आल्यावर खाणं कमी करतात
- तर काही जण स्ट्रेस इटिंग करतात
तणावात असताना आपण किती खातोय याचं भान राहत नाही. गोड पदार्थ, जंक फूड किंवा सतत काहीतरी खाणं यामुळे कॅलरीज झपाट्याने वाढतात. याच काळात खाणं पूर्णपणे सोडल्यास चयापचय मंदावतो आणि नंतर जास्त खाल्ल्यावर वजन झपाट्याने वाढू शकतं.
‘हॅपी हार्मोन्स’साठी खाण्याची सवय
तज्ज्ञ सांगतात की तणावात असताना शरीराला तात्पुरता आराम मिळावा म्हणून अनेक जण गोड पदार्थ खातात. केळी, चॉकलेट, चेरी यामध्ये आढळणारं ट्रिप्टोफॅन हे ‘हॅपी हार्मोन’ वाढवण्यास मदत करतं. मात्र याच सवयी पुढे वजन वाढीस कारणीभूत ठरतात.
हार्मोन्सचा असंतुलनही ठरतो कारण
जास्त तणावामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढते. इस्ट्रोजेन वाढल्यामुळे शरीरात चरबी साठण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे तणाव हा केवळ मानसिक समस्या न राहता शारीरिक त्रासाचंही कारण बनतो.
तज्ज्ञांचा सल्ला
Cleveland Clinicसह अनेक आरोग्य संस्थांच्या मते, तणाव आणि व्यायामाचा अभाव ही वजन वाढीसाठी सर्वात धोकादायक जोडी आहे. त्यातच अनियमित जेवण, जंक फूड आणि अपुरी झोप यामुळे समस्या अधिक गंभीर होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल?
- दररोज किमान 7–8 तास झोप घ्या
- नियमित चालणे, योग किंवा व्यायाम करा
- ध्यान, प्राणायाम किंवा आवडीच्या छंदांसाठी वेळ काढा
- जेवणाच्या वेळा ठरवा आणि जंक फूड टाळा
- मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घ्या
वजन वाढ ही फक्त खाण्याची किंवा बसून काम करण्याची समस्या नाही. मनावरचा ताण कमी झाला, तर शरीरही आपोआप संतुलनात येऊ शकतं. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात फक्त डाएटवर नाही, तर स्ट्रेस मॅनेजमेंटवरही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.

